satyaupasak

“शरद पवारांच्या बालेकिल्ल्यावर दादांचा डाव? लांडे-गव्हाणेंची घरवापसी; राजकीय गणितं बदलणार!”

अजित पवार: भोसरी विधानसभेत शरद पवारांची तुतारी वाजवलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा उचलणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुणे: विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) पिंपरी-चिंचवड (Pimpri) मध्ये राजकीय आघात दिला होता. आता मात्र अजित पवार त्याची परतफेड करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. याची सुरुवात भोसरी (Bhosari) विधानसभेतून होणार असल्याचं दिसत आहे. भोसरी विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा प्रचार करणारे विलास लांडे (Vilas Lande) आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.

याशिवाय, भोसरी विधानसभेच्या निवडणुकीत अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांची तुतारी वाजवलेले अजित गव्हाणे वीस माजी नगरसेवकांसह पुन्हा ‘घड्याळा’सोबत येणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आणि अजित गव्हाणे यांच्यात याबाबत चर्चा झाल्याचा दावा विलास लांडेंनी केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीआधी अजित पवारांनी स्वतःचा बालेकिल्ला अधिक मजबूत करण्यासाठी पत्ते उघडायला सुरुवात केली आहे.

विलास लांडे यांचे मत एबीपी माझाशी संवाद साधताना विलास लांडे (Vilas Lande) म्हणाले की, दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका स्थापन झाली आणि अनेक लोकनियुक्त नगराध्यक्षांनी शहराच्या विकासाला हातभार लावला. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली या भागात मोठ्या प्रमाणावर विकासकामं झाली. वसंतदादा पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांचं शहर उभारणीत मोलाचं योगदान होतं. यामध्ये अजित पवार यांचं योगदानही महत्त्वाचं आहे. एमआयडीसी आल्यामुळे महानगरपालिकेची ओळख निर्माण झाली नसती तर हे गावाचं स्वरूप तसंच राहिलं असतं. महानगरपालिकेत 1992 पासून अजित पवारांनी लक्ष घातल्यामुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलला आणि याचं श्रेय अजित पवारांनाच जातं.**

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला साथ आगामी महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचार करणार असल्याचं विलास लांडे यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय, अजित गव्हाणे आणि त्यांच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादीत परतण्याचा निर्णयही शहराच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.

अजित गव्हाणे आणि २० नगरसेवक परतणार?
विधानसभेच्या आधी अजित गव्हाणे आणि 20 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटात सामील झाले होते. अजित गव्हाणे आणि नगरसेवकांनी विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. हे सर्वजण पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होणार का? या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना विलास लांडे म्हणाले की, अजित गव्हाणे यांनी जेव्हा हा निर्णय घेतला होता, तेव्हा सकाळी अजित पवार यांच्यासोबत आणि संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत मीटिंग झाल्याचं स्पष्ट केलं. शरद पवार यांच्या मीटिंगला मी नव्हतो, मात्र माझं मत होतं की दोन्ही नेते आपले आहेत. पण प्रामाणिक राहून काम करणं महत्त्वाचं आहे.

गव्हाणे आणि पवार यांची फोनवरील चर्चा
अजित गव्हाणे आणि अजित पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याचंही समोर आलं आहे. यावर बोलताना विलास लांडे म्हणाले, अजित गव्हाणे यांनी मला सांगितलं की, त्यांना अजित पवार यांचा फोन आला होता. पक्षात परत आल्यास सर्वांना एकत्र घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यांनी आपल्या कामाला योग्य प्रकारे पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यांना दुर्लक्षित केलं जाऊ नये, असा सल्ला मी गव्हाणेंना दिला.

गव्हाणे यांनी त्यांच्या 20 नगरसेवकांसोबत चर्चा करून पुन्हा अजित पवार यांच्यासोबत जाण्याची शक्यता वर्तवली आहे. गव्हाणे म्हणाले की, “आपण कोणत्याही पक्षात सामील झालो नाही, पण पवारांवर आपली श्रद्धा आहे. अजित पवार हे आपले पहिल्यापासूनचे नेते आहेत. त्यांनी या शहराचं काम केलं असून या शहराला ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे त्यांचं महत्त्व आम्ही कधीच विसरू शकत नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.

विधानसभेनंतर शरद पवार गटातील अनेक नेते अजित पवार यांच्या गटात सामील होतील, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *